क्वचित केव्हा
क्वचित केव्हा कुट्ट कावळा
सोनकावळा होउन उडतो
क्वचित केव्हा मद्दड रेडा
घनपाठ्यांचे गंध लावतो
क्वचित केव्हा लुकडे प्यादे
आठ घरे ओलांडुन जाते
क्वचित केव्हा बोर किड्यांचे
पिवळाधम्मक नाग काढते
क्वचित केव्हा दीन चंद्रमा
सूर्याला खग्रास रोखतो
क्वचित केव्हा फकीर नंगा
सम्राटाचे वस्त्र फेडतो