पुन्हा समांतर
छतास मळका फिरेल पंखा
अनोळखी डोक्यांवर झुळझुळ
तटस्थ बाके फलाटावरी
प्रसवतील जांभया अजागळ
थकलेले मुंडासे कोठे
चावित राहिल काळी भाकर
उंचावरुनी घड्याळ पाहिल
लाल मुतारी फर्लांगावर
जीभ लोंबवित जाइल कुत्रे
ढुंगण हलवित लटलट लटलट
मुरकत येइल कोणी हिजडा
अंगाभवती पदर लपेटित
हिशेब काही मांडायाची
डोक्यामध्ये होइल खटपट
कागदपत्रे पिशवीमध्ये
सोसत बसतिल मुकाट घुसमट
शिट्टी मारत येइल एंजिन्
पाठोपाठ डब्यांची फरफट
गर्दीमधुनी वाट काढतिल
दोन पाउले अशी सराइत
धोतर, साड्या, लेंगे, पँटी
गिळेल गाडी पुरे लटांबर
खिडक्यांचे चौकोन सटकतिल
ठरल्या वेळेच्या गचक्यावर
कुत्रा, बाके, अन् मुंडासे
सरपट होइल नेत्रपटावर
एक नोकरी शोधायाला
रूळ धावतिल पुन्हा समांतर