मुक्ती
बिजागर्यांचे तुटतिल सांधे
नक्ष्यांच्या कुजतील चौकटी
कोसळून जाइल दरवाजा
अडसरास होइल विश्रांती
खाचरामधे निजेल नांगर
सुकून जाइल ढेकुळमाती
उखळाला ना उरेल दाणा
मुसळाची थांबेल कुटंती
लटकत राहिल रहाटगाडा
मडक्यांची संपेल भ्रमंती
आटुन जाइल पाणी सारे
प्रतिबिंबाला मिळेल मुक्ती