हद्द
घरामधूनी बटू चालला
पाठीशी रडवेली आई
उंबरठ्याशी थांबे, म्हणते
'इथेच माझी हद्द संपली'
रस्त्यामधुनी बटू चालला
खुशीत मागे कुत्रे येई
गाववेशिला थांबे, म्हणते
'इथेच माझी हद्द संपली'
शेतामधुनी बटू चालला
भुरुभुरु मैना संगे जाई
स्मशान येता थांबे, म्हणते
'इथेच माझी हद्द संपली'
स्मशानातुनी बटू चालला
खवीस खदखद पिच्छा पुरवी
माळापाशी थांबे, म्हणतो
'इथेच माझी हद्द संपली'
माळावरुनी बटू चालला
त्याच्यासोबत कोणी नाही
कारण सोबत तोडायाला
ह्या माळाला हद्दच नाही